Friday, 22 September 2017

नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने प्रशासन अहोरात्र सज्ज

शारदीय नवरात्र महोत्सव -2017

         उस्मानाबाद,दि.22:- श्री तुळजाभवानी नवरात्र महोत्सवास महाराष्ट्रासह  तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांमधून यात्रेकरु मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. या भाविकांना तत्पर सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासन तसेच मंदिर संस्थानासह विविध यंत्रणा अहोरात्र काम करीत असल्याचे चित्र तुळजापूरनगरीत पाहायला मिळत आहे.
          श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांना यावर्षी बायोमॅट्रीक पध्दतीने प्रवेश दिला जात असून  भाविक आनंदाने आणि उत्साहाने शिस्तबद्धरित्या दर्शन घेत असल्याचे दृश्य दिसत आहे. राजे शहाजी महाद्वार येथून दर्शनरांग बंद करण्यात आली असली तरी धर्मदर्शन आणि मुखदर्शनासाठी स्वतंत्र दर्शनरांगांची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनरांगांतील बदल भाविकांना समजण्यासाठी ठिकठिकाणी दिशादर्शक फलकही लावण्यात आले आहेत.
मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीवर जवळपास 2 हजारच्या आसपास अधिकारी-कर्मचारी वर्ग जागोजागी थांबून नियंत्रण ठेवत आहेत. मंदिर व आसपासच्या परिसराची सीसीटीवीद्वारे पाहणी केली जात असून प्रत्येक गोष्टीवर बारकाईने नजर ठेवली जात आहे.
भाविकांना आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री. राधाकृष्ण गमे  व पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणा घेत आहेत.
 आरोग्य विभागामार्फत उभारण्यात आलेल्या प्रथमोपचार केंद्रांचा चांगल्या प्रकारे लाभ भाविक घेत आहेत. यासाठी जवळपास वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, 108 क्रमांकाच्या विशेष सुसज्ज रुग्णवाहिका तुळजापूर येथे तैनात आहेत. 
शहरामध्ये येणाऱ्या वाहनांसाठी नगरपालिकेने वेगवेगळया ठिकाणी वाहनतळ उभारल्यामुळे वाहनांच्या होणाऱ्या त्रासापासून चालणाऱ्या भाविकांची सुटका झाली आहे , एस. टी स्टॅन्डवर भाविकांच्या सोयींसाठी विशेष गाड्यांची सोय, त्याबाबतच्या सूचना ध्वनीक्षेपणाद्वारे वेळोवेळी देणे, त्यांच्यासाठी लॉकर्स, रुम्सची व्यवस्था या बाबींची व्यवस्था करण्यात  आली आहे.
          बाहेरुन येणाऱ्या भाविकांना दर्शन रांगेची, वाहतूक मार्गात केलेल्या बदलाची माहिती मिळावी,यासाठी जागोजागी विविध भाषांमधील फलकांद्वारे माहिती दिली जात आहे. मंदिर परिसर आणि शहरातही अधिकाधिक स्वच्छता राहावी, यासाठी नगरपालिका यंत्रणा अहोरात्र काम करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील साफसफाई करण्यासाठी तुळजापूर नगरपालिकेच्या वतीने कर्मचारी कार्यरत असून शनिवारी महाद्वार चौक, आर्य चौक, कमानसेवा यासह अंतर्गत रस्त्यांची तसेच नाल्यांची साफसफाई करण्यात आली आहे. याशिवाय उस्मानाबाद रोड वाहनतळ ते नळदूर्ग रोडवरील गोलाई तसेच लातूररोड ते धारीवाला,शिवाजी पुतळा ते हेलीपॅड आदी ठिकाणचे गवत व झुडपे काढण्याचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. मुख्याधिकारी विजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी तुळजापूर शहर आणि मंदिर परिसर  येथे सतत लक्ष ठेवून आहेत.
          गुरुवार दिनांक 21 सप्टेबर रोजी रात्री श्री. राधाकृष्ण गमे यांच्या उपस्थितीत श्री तुळजाभवानी मंदिरात छबिना मिरवणूक काढण्यात आली. प्रक्षाळ पूजा झाली. यावेळी   अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, प्रांताधिकारी चेतन गिरासे, तहसिलदार तथा मंदिर संस्थानचे व्यवस्थापक सुनिल पवार,  तुळजापूरचे तहसिलदार  दिनेश झांपले, मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी याशिवाय भोपे, पुजारी, आराधी, गोंधळी व भाविक मोठ्या संख्येने  उपस्थित होते. तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवात श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा करण्यात आली. शारदीय नवरात्राची आज दुसरी माळ. सकाळपासूनच विविध भागातून येणाऱ्या भाविकांनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

शारदीय नवरात्राची आज दुसरी माळ.

तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवात श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा करण्यात आली. शारदीय नवरात्राची आज दुसरी माळ. सकाळपासूनच विविध भागातून येणाऱ्या भाविकांनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले

Thursday, 21 September 2017

घटस्थापनेने श्रीतुळजाभवानी देवीजींचा नवरात्र महोत्सवास प्रारंभ

महाराष्ट्राची कुलस्वामीनी आणि शक्तिदेवता श्रीतुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास तुळजापूर येथे मंगळवारी धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. श्रीतुळजाभवानी मंदिरात पहाटे पारंपारीक पध्दतीने श्रीदेवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर दुपारी 12 वाजता श्रीतुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या  यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली. मंत्रोच्चार, आई राजा उदो उदोचा जयघोष आणि संबळाच्या साथीने सर्व पुजाविधी  करण्यात आले.